नागपूर प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले की मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) पद्धतीद्वारे शिक्षण पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ४५६ विद्यार्थ्यांच्या निकालास विलंब झाला असून सद्य:स्थितीत हे निकाल लागले आहे.प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे निकाल उशिराने लागले.मुंबई विद्यापीठात कुलगुरू प्रभारी नाहीत. ते पूर्णवेळ आहे. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठात नवीन परीक्षा निकाल पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही पद्धत लागू करण्यास अडथळे निर्माण झाले.
या अडचणीतून विद्यापीठ आता बाहेर पडत आहे. मुंबई विद्यापीठात ६ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठ विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ३७२ परीक्षा घेते. पदव्युत्तर दूरस्थ: शिक्षण अभ्यासक्रमाचे निकाल वगळता सर्व निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात आले आहे असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.