मुंबई प्रतिनिधी : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित मै अटल हू हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केला.माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्यावर आधारित मै अटल हू या चित्रपटाचा विशेष विशेष खेळ आज सायंकाळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.या खेळाच्या समारोपानंतर अध्यक्ष ॲड. नार्वेकर माध्यमांशी बोलत होते.यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशाली दिग्दर्शक रवी जाधव आदी उपस्थित होते.
विधानसभेचे अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी सांगितले की मै अटल हू या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश जाईल.आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व होय.त्यांनी आयुष्यात समाजकारण राजकारण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचे ध्येय ठेवले होते.दिग्दर्शक जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.
मंत्री भुजबळ यांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरची आठवण सांगितली.ते म्हणाले की अटलबिहारी वाजपेयी कवी मनाचे लेखक होते.ते उत्कृष्ट वक्ता होते.त्यांची भाषणे नेहमीच ऐकत होतो.यावेळी विधिमंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८