रावेर - गेल्या दोन वर्षांत जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचाच वरचष्मा होता. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात राजकिय भूकंप झाला असून याचे सर्वाधिक हादरे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला बसणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्याचे राजकारण शिवसेना नेते सुरेशदादा जैन व भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या पलीकडे गेले नाही. जळगाव शहर वगळता जिल्ह्यात एकनाथ खडसे यांचीच चलती राहिली आहे व जिल्ह्यात भाजपाचे क्रमांक दोनचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन असले तरी जिल्हा परिषद वगळता त्यांचा अन्य ठिकाणी फारसा हस्तक्षेप नसायचा! मात्र आता एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्याची राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात होईल यात शंका नाही. जिल्हा भाजपात खडसे व महाजन समर्थक असे दोन गट असले तरी संपूर्ण जिल्हा खडसेंच्या अधिकारात राहीला आहे. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याचा चेहरा कोण हा येणारा काळच ठरवेल. येत्या काळात काही नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. सध्या जिल्हा भाजपाचे सर्वधिक २३ तर शिवसेनेचे १५ सदस्य आहेत दुसरी वाडे राष्ट्रवादीचे २० व काँग्रेसचे १० सदस्य आहेत. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचे परिणाम या दोन्ही निवडणुकांवर पडतील व त्यात भारतीय जनता पार्टीची घडी थोडी विस्कटणार हे नक्की. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आघाड्यांच्या बेरजेवर व घोडेबाजारावर लढवल्या जातात व अशाच आघाड्यांसाठी मास्टर की म्हणून एकनाथ खडसेंकडे बघितले जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व निवडणुकांवर एकनाथ खडसेंचीच छाप पडल्याचे दिसते आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलतील हे मात्र नक्की.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांची राजकीय समीकरणे बदलणार!