सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलदगतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा नव्या स्वरुपातील सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खातेउताराचीही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.